राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील रखडलेली डॉक्टर भरती (Pune Doctor Recruitment) करण्यात येणार आहे. महापालिकेतील कायम स्वरूपी भरण्यात येणाऱ्या पदांची ‘मेरिट लिस्ट’ (Merit List) जाहीर झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांची भरती करण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेत महापालिका एकूण 1283 पदे भरणार आहे. यातील 1105 पदे ही तात्पुरत्या स्वरुपाची आहेत. तर 178 पदे ही कायम स्वरुपाची आहेत. आज निवडलेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट लागणार आहे. (हेही वाचा -गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला साहेबांच्या आवडीचे पदार्थ करून घरातचं फोटोसमोर दोन दिवे लावून अभिवादन करा; पंकजा मुंडे यांचे जनतेला भावनिक आवाहन)
कोरोना विरोधातील लढाईत डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर वैद्यकिय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या लढाईत अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काहींचा कोरोनामुळे बळी गेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे कर्मचारी रात्रदिवस कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना आरामाची गरज आहे. म्हणून पुणे महापालिकेने रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रखडलेली भरती प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी महापालिका आयुक्त गायकवाड यांना भरतीसाठीची ‘मेरिट लिस्ट’ तत्काळ जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी राज्यातील 1 हजार हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या मेरिट लिस्ट नंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम यादीत नावे असणाऱ्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तत्काळ कामावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी होणार आहे.