पुणे (Pune) येथे शुक्रवारी संध्याकाळपासून जोरदार वादळी वाऱ्यांसहित मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. अनेक भागात या पावसामुळे घरांची छप्परे उडून गेल्याचे, झाडे मोडून पडल्याचे देखील अनेक प्रसंग घडले. यावेळी विश्रामबागवाडा परिसरात एक अशीच घटना घडत होती. याभागात पोलिसांची नाकेबंदी सुरु आहे, या पोलिसांचे कामावर असताना उन्हापासून रक्षण व्हावे तसेच काही क्षण सावलीत आराम करता यावा म्हणून एक तंबू बांधण्यात आला आहे. मात्र कालच्या पावसात इतक्या वेगाने वारा वाहत होता की या तंबूचे छप्पर सुद्धा उडून जात होते, अशावेळी त्या तंबू मध्ये असणाऱ्या एका पोलिसाने आपल्या हाताने हे छप्पर धरून ठेवले होते. 10 ते 15 मिनिटे या पोलिसाने ही कसरत केली आणि या तंबूचे रक्षण केले. या प्रसंगाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ पुणे महानगरपालिकेचे (PMC) महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सुद्धा शेअर करून पोलिसांच्या या अथक मेहनतीला सलाम केला आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी “सलाम… कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घटकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. मात्र ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हे योद्धे लढत राहतात. आजच्या पावसात विश्रामबागवाड्यासमोर दिसलेलं हे चित्र याचीच साक्ष देते”, असे ट्विट केले आहे. (हे ही वाचा - महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार COVID-19 संक्रमितांची एकूण आकडेवारी, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)
मुरलीधर मोहोळ ट्विट
सलाम @PuneCityPolice !
कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घटकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. मात्र ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हे योद्धे लढत राहतात. आजच्या पावसात विश्रामबागवाड्यासमोर दिसलेलं हे चित्र याचीच साक्ष देते.@CPPuneCity pic.twitter.com/q2eXptG39y
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 1, 2020
महापौरांच्या ट्विटला पुणे पोलिस आयुक्तांनी रिप्लाय करून आभार मानले आहेत. . ‘तुमच्या नेतृत्वाखाली भविष्यातही आमचे कार्य असेच सुरू राहील’, अशा आशयाचे पुणे पोलीस आयुक्तांचे ट्विट आहे.
पुणे पोलीस आयुक्त ट्विट
Thank you Mayor @mohol_murlidhar .
With u leading in the front,
We will do more ... https://t.co/UwzMUHW7bG
— CP Pune City (@CPPuneCity) May 1, 2020
दरम्यान, काल याच पावसाने शिवाजीनगर भागातील संचेती हॉस्पिटल जवळील दिशादर्शक कमान वादळी वाऱ्याने कोसळली . तर, मंगळवार पेठ परिसरात मोबाईल टॉवर कोसळला. पण सुदैवाने लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. याबाबत पुणे महापालिकेने ट्विट करत माहिती दिली आहे.