पुण्यात एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना चोट्याने डाव साधत तब्बल 12 लाखांच्या मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती. या आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून या चोराला बेड्या ठोकल्या आहेत. 13 ऑक्टोबर रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील पटवर्धन बाग एरंडवणे येथे साईश्रद्धा बंगल्यातुन पहाटेच्या वेळेस लक्ष्मीपुजनाकरीता दागिने आणि पैसे ठेवण्यात आले होते. हा सर्व मुद्देमाल चोरीला गेला होता. (हेही वाचा - Nalasopara Minor Girl Rape Case: नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला वाराणसीतून अटक)
या चोरीच्या प्रकरणाची अनिल नाईक यांनी अलंकार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. घटनेची दखल घेत पोलिसांनी जवळपास 100 पेक्षा अधिक सीसीटिव्ही तपासले. एरंडवणे भागातून सीसीटिव्ही फुटेज तपासात पोलीस नांदेड गावापर्यंत पोहेचले. दरम्यान, तपास पोलिसांना या प्रकरणातील आरोपी हा नांदेडगाव जगताप नगर येथे रहात असल्याची माहिती मिळाली होती.
तपास पथकाने संतोष किसन शिलोत यास ताब्यात घेऊन फिर्यादी यांच्या घरातून चोरी केलेले सोन्याचे दागीने व ३.५० लाख रुपये रोख रक्कम, गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटारसायकल मोबाईल असा तब्बल १२ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस सध्या या आरोपीने आणखी कुठे चोरी केली आहे, याचा तपास करत आहेत.