पुणे (Pune) शहरातील खासगी वाहनांची संख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. खासगी वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. रस्त्यावरील गर्दी, जाम, ट्राफिक वाढले आहे. या सर्वांचा परिणाम वायू प्रदूषणावरही होत आहे. अशा परिस्थितीत पीएमपीएमएलच्या (PMPML) सेवेचे बळकटीकरण करून प्रवासी संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अशात गेल्या वर्षभरात पीएमपीएमएलची प्रवासी संख्या 2 लाखांहून कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षातील प्रवाशांची आकडेवारी जाहीर केली आहे.
या आकडेवारीनुसार महिन्याला सरासरी 8 लाख 738 प्रवाशांनी पीएमपीएमएल बसमधून प्रवास केला आहे. पीएमपीएमएलने दरवर्षी 10 ते 12 लाख प्रवाशांचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र तो पूर्णपणे फसला आहे. पीएमपीएमएलच्या ताज्या आकडेवारीवरून पुणेकर सार्वजनिक वाहतुकीला फारसे प्राधान्य देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएमपीएमएलने जाहीर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पीएमपीएमएल बसमधून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
शैक्षणिक वर्ष जून ते ऑगस्टमध्ये सुरू होते. मार्च आणि एप्रिलमध्ये परीक्षा होतात. या महिन्यांत पीएमपीएमएच्या प्रवाशांची संख्या 8 लाखांच्या पुढे गेली आहे. उर्वरित महिन्यात प्रवाशांची संख्या 7 ते 8 लाखांच्या दरम्यान असते. दिवाळीतही पीएमपीएमएलच्या प्रवाशांची संख्या अधिक असते, हे आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षी पीएमपीएमएलने प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून सेवा न दिल्याने प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Pune: पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाला सेनापती बापटांचे नाव द्या; सुप्रिया सुळे यांची मागणी)
यामध्ये प्रामुख्याने प्रवाशांना वेळेवर बस न मिळणे, पीएमपीएमएलच्या तिकीटांचे आणि योग्य ट्रिप्सचे योग्य नियोजन नसणे, वाहतूक कोंडी, प्रवाशांसाठी पुरेसे बस थांबे नसणे, खासगी वाहनांच्या तुलनेत तिकीट व इतर सुविधा नसणे अशा कारणांचा समावेश आहे.