पुणे: भावाच्या खुनाची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

पुणे (Pune) येथील धानोरी (Dhanori)  परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या भावाच्या खुनाची धमकी देत बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पुणे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर धनंजय मारमिल्ले नामक एका 28 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच याच्यावर 'POSCO' म्हणजेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्व्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी धनंजय याने मुलीला तिच्या भावाला जीवे मारण्याचे धमकी देऊन आपल्याशी बोलण्यासाठी जबरदस्ती केली होती. ज्यानंतर, त्याने तिला स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

मटाच्या वृत्तानुसार, धानोरी परिसरात पीडित मुलगी आई वडील आणि भावासोबत राहत होती. घटना घडल्याच्या दिवशी तिचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारच्या वेळी ही मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली असताना आरोपी धनंजयने तिला वाटेत अडवले. यानंतर तो तिला आपल्याशी बोलत का नाही, असा सवाल करू लागला, यामुळे घाबरलेल्या मुलीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याने तू माझ्यशी बोलली नाहीस तर तुझ्या भावाला मारून टाकेन अशी धमकी दिली. यानंतर त्याने पीडित मुलीला ओढत स्वतःच्या घरी नेले व तिथे तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान मुलीच्या मामाचा मृत्यू झाल्याने मुलीची आई मुलीला शाळेतून घरी नेण्यासाठी गेली. पण त्यांना मुलगी शाळेत आलीच नाही असे सांगण्यात आले. यानंतर आई मुलीचा शोध घेत असताना पीडिता आरोपीच्या घरात विवस्त्र अवस्थेत रडताना सापडली. मुलीला घरी आणून आईने विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर धनजंयने बलात्कार केल्याचे सांगितले. (खारघर: संतापजनक! रस्त्यावरील कुत्रीवर व्यक्तीकडून बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल)

याप्रकरणी सध्या पोलीस आरोपी धनंजयची चौकशी करत आहेत. मात्र वारंवार समोर येणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे पोलीस प्रशासन व महिला सुरक्षेवर संतप्त नागरिक प्रश्न करत आहेत.