पुणे (Pune) शहरातील महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) चे दोन मार्ग-वनाज ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी ते फुगेवाडी हे लोकांसाठी 6 मार्चपासून खुले होणार आहेत. महा-मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, '6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर दोन्ही मार्ग सार्वजनिक वापरासाठी कार्यान्वित होतील. मार्गांचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे आणि उद्घाटनापूर्वी वनाझ मार्गावरील काही किरकोळ कामे केली जातील.’
पिंपरी-फुगेवाडी स्थानकाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) कडून 6 जानेवारीला मंजुरी मिळाली व 10 फेब्रुवारीला वनाज-गरवारे महाविद्यालय मार्गाची तपासणी करण्यात आली. काही दिवसांत या दोन्ही मार्गांना प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकतेच, वनाझ डेपोला मेट्रो रेकची देखभाल आणि धुण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा मिळाल्या आहेत. मेट्रोच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या इतर बाबी तयार होत असल्याचे अधिकाऱ्यांनी संगोतले. (हेही वाचा: PCMC Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला पडणार मोठे खिंडार पडण्याची शक्यता, 20 ते 25 नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत)
वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यान पाच स्टेशन असून हे पाच किलोमीटरचे अंतर आहे. 30 जुलै रोजी वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यान ट्रायल रन घेण्यात आली. उद्घाटनाची तारीख लक्षात घेऊन महा-मेट्रो अधिकार्यांनी स्थानिक चालकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. जनतेसाठी सेवा सुरू होण्यापूर्वी किमान 30 ड्रायव्हर्सना प्रशिक्षित केले जाते. ते सर्व अनुभवी ड्रायव्हर्स आहेत आणि ते तयार होत आहेत. पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान 5.8 किमी अंतराची ट्रेल रेल्स वाढवली आहे.
दरम्यान, दिवाणी न्यायालय रामवाडी मार्गावर 90% मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. दिवाणी न्यायालय-रामवाडी स्ट्रेच आरटीओ, पुणे स्टेशन, बंड गार्डन, कल्याणीनगर आणि येरवडा येथून जातो. या मार्गावर काम जवळजवळ पूर्ण झाले असून, सध्या, संगम पुलाजवळ व्हायाडक्टचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महा-मेट्रो डिसेंबर 2022 पर्यंत सर्व मेट्रो मार्ग पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.