पुण्यातील (Pune) शिरूर (Shirur) तालुक्यातील पिंपळसुटी (Pimpalsuti) गावात 24 डिसेंबर रोजी बिबट्याने चार वर्षांच्या चिमुरडीचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही चिमुरडी घराबाहेर खेळत असताना बिबट्याने हल्ला केला आणि तिला जवळच्या उसाच्या शेतात ओढून नेले. तिच्या आईने हा प्रकार लक्षात येता मदतीसाठी आरडाओरडा केली मात्र तो पर्यंत बिबट्याने मुलीचा जीव घेतला होता. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रक्षा निकम (Raksha Nikam) असे या मुलीचं नाव आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आणि दोन तासांनंतर रक्षाचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह सापडला आहे. पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली असून, या वर्षी किमान 10 मृत्यू झाल्यामुळे या घटनेने चिंता वाढवली आहे. Leopard in Wagholi: पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा आढळला बिबट्या; रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची चिंता वाढली (Watch Video) .
जुन्नर विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक मीता राजहंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही स्टॅडर्ड प्रोसिजरचं पालन करत आहोत आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत." दुसऱ्या एका घटनेत, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण गावात ७ डिसेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. लताबाई बबन धावडे (५०) असे मृत महिलेचे नाव आहे. कडेठाण येथील त्या रहिवासी होत्या.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लताबाई कडेपठाण येथील उसाच्या मळ्यात काम करत असताना शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि ओढून नेले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. लताबाई यांच्या मागे त्यांचे पती आणि दोन मुले आहेत. तिच्या मृत्यूने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.