पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका गरोदर महिलेस (Pregnant Woman) डॉक्टरने (Doctor) अमानुष मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील यवत (Yavat) येथील एका रुग्णालयात हा प्रकार घडला. गरोदर महिलेस प्रसूती कळा येत असताना डॉक्टरांनी ही मारहाण केली. दरम्यान, या घटनेची यवत पोलिसांनी दखळ घेतली असून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. न्युज 18 लोकमतने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पूजा गोरख दळवी असं मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या गरोदर होत्या. प्रसुती वेदना सुरु झाल्याने त्यांना यवत येथील नामांकित जयवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. आरोपी डॉक्टरने तोंडावर, डोक्यावर, हातांवर, मांडीवर आणि ओठांवर चापटीने आणि बुक्क्याने अमानुष मारहाण केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. (UP: अंधश्रद्धेमुळे मुलाचा गेला जीव, भूत उतरवण्याच्या नावाखाली तांत्रिकाने केली बेदम मारहाण)
या मारहाणीत पूजा यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला चेहऱ्यावर काळ्या निळ्या जखमा झाल्या आहेत. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिलांवरील अत्याचार, छळाच्या अनेक बातम्या सातत्याने समोर येत असतात. औषधांसाठी पैसे मागणाऱ्या एका जेष्ठ महिलेला तिच्या पतीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार अहमदाबाद येथून समोर आला होता. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. लग्न झाल्यापासून अनेकदा या महिलेचा छळ करण्यात आला. मात्र यावेळी तिने हिंमत करुन पतीविरुद्ध आवाज उठवला.