Pune Dengue Cases:पुणे शहरात झिका व्हायरससह डेंग्यूच्या धोक्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे डांसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. झिका व्हायरससह(Zika virus) शहरात डेंग्यूच्या(Dengue) रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. एकट्या जुलै महिन्यात डेंग्यूचे एकूण 216 संशयित रुग्ण पुण्यात आढळले आहेत. त्यातील 156 रुग्ण हे या आठवडाभरातील आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्ती जागा शोधून त्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
पुण्यात झिकाची रुग्णसंख्या ही 23 वर गेली आहे. पुण्यापाठोपाठ झिकाचे कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये आढळले. तेथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. पुणे शहरात झिकाच्या रुग्णांमध्ये 10 गर्भवती मातांचा समावेश आहेत. सासवड, मुळशीतील भूगाव या ठिकाणी झिकाची व्हायरसचा प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळून आला आहे. झिका व्हायरसचा धोका गर्भवती मातेला आणि तिच्या गर्भाला असतो. तसचे लहान मुलांनाही आहे. त्यामुळे गर्भवती मातांच्या चाचण्या आणि तपासणीवर पालिकेकडून भर दिला जात आहे.
त्याशिवाय, शहरात चिकुनगुनियाचे 15 रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये 5, मार्च महिन्यामध्ये 4, एप्रिल महिन्यामध्ये 2 आणि आता जुलैमध्ये 5 रुग्ण आहेत.