पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणू (Coronoavirus) काळात सरकारने राज्यात अनेक नियम लागू केले आहेत. यातील एक महत्वाचा नियम म्हणजे मास्क (Mask) घालणे बंधनकारक केले आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी जनता या नियमाचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कारवाया देखील सुरु आहेत. मात्र आता पुण्यातून (Pune) याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनामास्क मोटारचालकाला कारवाईसाठी अडवले असता, गाडीचालकाने वाहतूक हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) परिसरामध्ये ही घटना घडली आहे. पोलीस विनामास्क असलेल्या चालकाला अडवण्याचा प्रयत्न करीत होते व त्यावेळी पोलिसाच्या पायाला गाडीचा धक्का लागून ते बोनेटवर पडले. अशा स्थितीत गाडी चालकाने गाडी पोलिसाच्या अंगावर घालून तब्बल 1 किमीचा चालवत नेली. यावेळी पोलिसाने बोनेटला पकडून आपला जीव वाचवला. शेवटी आजूबाजूच्या लोकांनी धावत्या गाडीसमोर आपल्या गाड्या घालून ही धावणारी गाडी थांबवली. गुरुवारी सायंकाळी चार वाजता अहिंसा चौक ते चिंचवड पोलीस स्टेशन मार्गावर ही ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (हेही वाचा: Mumbai: अंधेरी, जुहू परिसरात सुरु असणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा NCB कडून पर्दाफाश; आरोपीस अटक)

पहा व्हिडिओ -

मिळालेल्या माहितीनुसार, आबासाहेब सावंत असे वाहतूक पोलिसाचे नाव आहे तर 50 वर्षीय युवराज हणवते असे मोटार चालकाचे नाव आहे. सावंत यांना हणवते विनामास्क गाडी चालवत असल्याचे दिसले. त्यांनी गाडी थांबवून पावती करण्यास सांगितले मात्र हणवते हळू हळू गाडी पुढे घेत गेला. त्याचवेळी सावंत यांचा पाय चाकाला लागून ते बोनेटवर पडले. त्यानंतर हणवते याने गाडीचा वेग वाढवला व तो गाडी अजून पुढे घेत गेला. वारंवार विनंती करूनही त्याने गाडी थांबवली नाही. शेवटी इतर नागरिकांनी गाडी मधे घालून हा प्रकार थांबवला. आता या प्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा हणवतेंवर दाखल करण्यात आला आहे व चिंचवड पोलीस पुढचा तपास करत आहेत.