Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोनाचे संकट वावरत असताना राज्यातील पुणे (Pune) जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. यातच पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील एका रिक्षाचालकाने कॅनॉलमध्ये उडी मारून (Suicide) आपले जीवन संपवले आहे. कोरोना विषाणूची बाधा होईल, या भितीने त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील लगड मळ्याच्या पाठमागील कॅनॉल लगतच्या झुडुपात मृतदेह अडकल्याचे माहिती एका नागरिकांनी स्थानिक पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला आहे. खिशात असलेल्या ड्राईव्हिंग लायसन्सवरून मृताची ओळख पटली आहे. तसेच कोरोना विषाणूची बाधा होईल, यामुळे आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठीही पोलिसांना मिळाली आहे.

अनिल बाबुराव खाटपे (54, रा. बडदे चाळ , गारमाळ, धायरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. खाटपे यांचा पत्नी, दोन मुले, सुना, नांतवडे असा परिवार आहे. खाटपे सोमवारी सायंकाळी घराबाहेर पडले होते. मात्र, रात्री 8 च्या सुमारास त्यांचा मृतदेह लगड मळ्याच्या पाठमागील कॅनॉल लगतच्या एका झुडुपात अडकल्याचे दिसल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह कॅनॉलबाहेर काढला. मृत व्यक्तीच्या खिशात एक सुसाईड नोट आणि ड्रायव्हिंग लायसन्स आढळले आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली. दरम्यान, खाटपे यांनी आणखीन एक सुसाईड नोट घरात लिहून ठेवल्याचे त्यांच्या कुटुंबियांना आढळून आले. याप्रकरणी तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहेत. हे देखील वाचा- मुंबई: मालाड येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरूणीचा विनयभंग; 2 जणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. तर, दुसरीकडे आत्महत्येच्या घटेनेतही वाढ होऊ लागली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत अनेकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.