Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी आदेश (Prohibition order in Kolhapur District) लागू केले आहेत. 29 एप्रील पर्यंत हे आदेश लागू राहतील. बंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षाही अधिक लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. तसेच जमाव करणे, मिरवणुका व सभा घेणे, धार्मिक, सांस्कृतीक सोहळे, उरुज, जत्रा आदी ठिकाणचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीत करुन ते व्हायरल करणे आदी गोष्टींवर बंदी आहे. शिवाय लोकभावना भडकतील, कोणाच्या भावनांना इजा होईल अशा प्रकारचे पोस्टर्स प्रसिद्ध करणे, स्टेटस ठेवणे, सामाजिक सलोखा बिघडून तेड निर्माण होईल अशा गोष्टी टाळण्यासाठी हे बंदी आदेश लागू करण्यात आल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हाभर बंदी आदेश लागू करण्यात आले असले तरी, पारंपरीक यात्रा, सण, समारंभ, उरुस, मयत, जयंती उत्सव, लग्न समारंभ अथवा इतर काही धार्मिक कार्यक्रम, प्रेतयात्रा आदींसाठी हे बंदी आदेश शिथील असणार आहेत. अशा कारणांसाठी जमणाऱ्या गर्दीला बंदी आदेशातून वगळण्यात आले असले तरी, नागरिकांवर शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे बंदन कायम असणार आहे. याशिवाय, कर्तव्यपालनासाठी एकत्र येणारे सरकारी कर्मचारी, त्यांना मदत करणारे नागरिक अथवा पूर्व परवानगी घेऊन झालेल्या गर्दीलाही बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
केवळ नागरिकांनी जमाव करुन एकत्र येण्यावरच नव्हे तर इतरही काही गोष्टींवर बंदी आहे. जसे की, लाठ्या-काठ्या, सुरे, सलवारी, भाले, बरचे, दंडे, बंदुका इथवार शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येऊ शकेल अशी कोणतीही वस्तू. आदी गोष्टींची वाहतूक करणे अथवा सोबत बाळगणे यांवर बंदी आहे. याशिवाय घातक रासायनिक पदार्थ, स्फोटके, ज्वलनशील पदार्थ, दगड किंवा इतर शस्त्रे, दारुगोळा सदृश्य वस्तू साधणे आदी बाळगणे, त्याची वाहतूक करणे यावरही बंदी आहे.
धार्मिक सण, उत्सव, प्रेतयात्रा, व्यक्ती, वस्तू, वास्तू आदींचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ पुढे पाठवणे, व्हायरल करणे, जमा करणे त्याची निर्मिती करणे, फोटो व्हिडिओ मॉर्फ करणे, राज्य, देश, समाज, व्यक्ती अथवा समूह, महापुरुष, देव, धर्म यांची बदनामी करणे, तसा मजकूर, सामग्री, अफवा पसरवणे आदी गोष्टींवरही बंदी असणार आहे.