कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन सोडले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. कोरोनाच्या संकट काळात योग्य वेळी उपचार न मिळाल्याने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल (Thane Municipal Commissioner Vijay Singhal) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका परिसरातील खाजगी रुग्णालयांनी यापुढे कोरोना संशयितावर उपचार करण्यास नकार दिला तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच रुग्णालयाच्या संचालकांविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात येईल, असा आदेश विजय सिंघल यांनी दिला आहे. विजय सिंघल यांच्या निर्णयामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना संशयित रूग्ण कोणत्याही नॅान कोव्हीड रूग्णालयामध्ये उपचारासाठी आल्यास प्रथम त्यास ट्रायेज एरियामध्ये दाखल करून घेण्यात यावे. आवश्यकतेप्रमाणे पीपीई किटस् आणि इतर सुरक्षित किटसचा वापर करून त्याच्यावर उपचार करण्यात यावेत. शहरातील नॅान कोव्हीड खासगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड संशयित रूग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रूग्णालयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच रूग्णालयाच्या संचालकांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा विजय सिंघल यांनी दिला आहे. महत्वाचे म्हणजे, सदर रूग्णास इतर रूग्णालयामध्ये पोहोचण्यास विलंब झाल्यास अथवा त्या रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला सबंधित रुग्णालय जबाबदार असेल, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Mumbai Hospitals and Clinics Dashboard: मुंबईमधील Non-COVID-19 रुग्णालयांची व क्लिनिकची यादी; एका क्लिकवर जाणून घ्या शहरातील आयसीयू बेड, रुग्णवाहिका व इतर माहिती
ट्वीट-
🚨 #Update
शहरातील नॅान कोव्हीड खासगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड संशयित रूग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रूग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच रूग्णालयाच्या संचालकांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा मा. आयुक्त श्री.विजय सिंघल यांनी दिला आहे.
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) May 30, 2020
ठाण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात आतापर्यंत एकूण 8 हजार 638 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 729 जणांनी कोरोनावर मात केली आहे.