Nana Patole | (Photo Credits: Twitter)

Nana Patole on Narendra Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासंदर्भात अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत. ओबीसींची मते मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत. याबाबतची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'देशातील जनतेला वाटतं आपले पंतप्रधान हे ओबीसी आहेत. पण तसं नाही. काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल हे लवकरच प्रत्येक राज्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार आहेत. या संदर्भातील सर्व कागदपत्रे ते सादर करणार आहेत. मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत. ओबीसी समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपने त्यांना प्रोजेक्ट केलं आहे.' (हेही वाचा - Narayan Rane On Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यावरून नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'खरी शिवसेना शिंदे गटाची असून येत्या काळात त्यांनाचं धनुष्यबाण मिळणार')

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, 'प्रश्न केवळ नरेंद्र मोदींच्या ओबीसी असण्याचा किंवा नसण्याचा नाही. आज संपूर्ण ओबीसी समाज संकटात आहे. देशाचं संविधान संकटात आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या आयोगाने आडनावावरून माहिती गोळा केली होती. आडनावावरून जात कळत नाही. एकाच आडनावाचे लोक विविध जातींचे असू शकतात. नरेंद्र मोदींच्या बाबतीतही हेच घडलं आहे,' असंही यावेळी पटोले म्हणाले.

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी फॉक्सकॉन प्रकल्पावरून भाजपवर निशाणा साधला. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, 'फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाऊ देणारे सगळे मोदी आणि अमित शहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्रातील तरुणांशी काहीही देणंघेणं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाचगाण्यात व्यस्त आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. ते आता महाराष्ट्राला गुजरातच्या पुढं नेण्याच्या गोष्टी करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातला काय काय नेलं याची यादी द्यायला हवी, अशी खोचक टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.