महाराष्ट्रात मान्सून (Monsoon 2022) लवकरच आगमन करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रा मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rains) हजेरी लावली आहे. अनेक ठिकणी नद्या, नाले ओसांडून वाहात आहेत. तलाव तुडूंब झाले आहेत. तर काही ठिकाणी मंदिर आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तिर्थक्षेत असलेल्या ठिकाणी मंदिरे पाण्याखाली गेल्याने भक्तांना गुडघाभर पाण्यात उतरुन प्रदक्षणा घालावी लागत आहे. अनेक ठिकाणचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत हे नेहमीच दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. परंतू या ठिकाणीही मानसूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी रस्त्यावरचे पूल पाण्याखाली गेले आहेत. नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गुड्डापूर येथील मंदिर जलमय झाले आहे. त्यामुळे भक्तांना मंदिराला प्रदक्षिणा घालताना कसरत करावी लागत आहे. तरीही भक्त पाण्यातून वाट काढत प्रदक्षणा घालण्याचा हट्ट पूर्ण करत आहेत.
मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने आणि पावसाचे प्रमाण काहीसे अधिक असल्याने ओढे, नदी आणि नाल्यांनाही पूर आला आहे. प्रामुख्याने अधिक पाऊस पडल्याने ळसंग ते सोर्डी रस्ता पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी तो रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. याशिवाय उमराणी, बिळुर, मुचुंडी, शेगाव, वाळेखिंडी, जत शहर आदी भागातही पर्जन्यवृष्टी अधिकची पाहायला मिळाली आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती)
अहमदनगर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावलीआहे. नगर शहरातील सावेडी, पाईपलाईन रोड ,सर्जेपुरा माळीवाडा परिसरात विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आगोदरच महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज वर्तवला होता. याशिवाय हवामान विभागाने वर्तवलेला हवामानाचा अंदाज विचारात घेऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात 19 ते 21मे या काळात यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.