कोरोना विषाणुने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. भारतातही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूबाबत चुकीची माहिती (Fake News) पसरवली जात असल्याची अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. “जर कुणी कोरोना विषाणू संबंधित एप्रिल फूल (April Full Message) केले तर, मेसेज करणाऱ्यावर आणि अॅडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहे”, असा इशारा पुण्याचे सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे Ravindra Shisve) यांनी दिला आहे. सध्या भारतात येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, सोमवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
देशावर कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणिला खोटे मेसेज पाठवणूक फसवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यावर्षी एप्रिल फुलमध्ये कोरोना विषाणू संबंधित चुकीचे मेसेज पाठवल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नसल्याची दक्षता घ्यावी. यासंदर्भात ग्रुप ॲडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना याबाबत सूचना द्याव्यात. त्याचबरोबर सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल, अशी सेटिंग करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. “कोरोना विषाणू संदर्भात व्हॉट्स्अॅपवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे मेसेज पाठवले जातात. त्यामुळे अनेक अफवा पसरल्या जात आहेत. असे मेसेज पाठवणाऱ्यांना अटक आणि दंडाची शिक्षा असल्याचे शिसवे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Outbreak: IAS अधिकारी अश्विनी भिडे आणि एन रामास्वामी यांची कोरोना संकटाला रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत नियुक्ती
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 97 हजार 244 वर पोहचली आहे. यांपैकी 32 हजार 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 108 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 225 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.