Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना यापुढे अंमलदार म्हणून संबोधले जाणार; कारण घ्या जाणून
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) काम करणारे पोलीस शिपाई पासून पोलीस हवालदार तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा सरसकट उल्लेख पोलीस कर्मचारी असा करण्यात येत होता. पोलीस कर्मचाऱ्यांना शिपाई या संबोधनावर आक्षेप होता. यामुळे यापुढे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, नायक पोलीस शिपाई, जमादार, सहायक फौजदार यांचा ‘पोलीस अंमलदार’(Police Amaldar) असा उल्लेख करण्यात यावा, असे परिपत्रक राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांसाठी काढण्यात आले आहे. तसेच पोलीस घटक कार्यालयाकडून शासनाला, महासंचालक कार्यालयात व इतर घटक कार्यलयांना होणाऱ्या पत्र व्यवहारात हा बदल तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलिस शिपाई म्हणजे जणू चपराशी वाटत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांची भावना होती. पोलीस महासंचालक कार्यालयाने अखेर याची दखल घेतली. तसेच पोलीस शिपाई नव्हेतर पोलीस अंमलदार असे संबोधण्याचे आदेश जारी केले आहेत. कारण, अंमलदार कर्मचारी या शब्दात वेगळेच वजन आहे. त्यामुळे हा शब्द पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी योग्य शब्द आहे. यापुढे पोलीस अंमलदार हाच शब्दप्रयोग सर्व पोलीस कार्यालयांकडून करण्यात यावा, यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे. हे देखील वाचा- Mumbai Traffic Police Beaten By Women: मुंबई येथे वाहतूक पोलिसाला महिलेकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट कायम आहे. या काळात कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी महत्वाची भुमिका बजावत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी आणखी 69 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 26 हजारांच्या वर गेली आहे. यापैकी 274 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, 24 हजारांहून अधिक पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.