एका महिलेने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस (Mumbai Traffic Police) कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई (Mumbai ) येथील काळबादेवी (Kalbadevi) परिसरात असलेल्या कॉटन एक्सचेंज नाका (Cotton Exchange Naka) येथे काल (शुक्रवार, 23 ऑक्टोबर) घडली. आरोपी महिलेने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत दादागिरी केली. पोलिसांना मारहाण केली. महिलेने इतका उद्दामपणा दाखवला की, तिने पोलिसाच्या कॉलरला हात घातला. तसेच, पोलिसाच्या कानशिलातही लगावल्या.
सादविका रमाकांत तिवारी (वय -30 रा. मशीद बंदर) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेसह तिचा मित्र मोहसीन निजामउद्दीन खान (26) राहणार भेंडी बाजार अशा दोघांवर एल टी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सादविका आणि मोहसीन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेबाबत माहिती अशी की, काळबादेवी येथील कॉटन एक्सचेंज नाका या ठिकाणी वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. या वेळी सादविका आणि तिच्यासोबतचा एक इसम ( निजामउद्दीन खान) हा या ठिकाणी आला. या दोघांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी दोघांना हटकले. असता या महिलेने वाहतूक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना मारहाण केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एल. टी. मार्ग पोलीस ठाणे दप्तरी भारतीय दंड संहिता कलम 353,332,504,506 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यामुळे असे वर्तन करणाऱ्यांची हिंमत वाढते. असे लोक मुंबई पोलिसांवह हल्ले करायला धजावतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. (हेही वाचा, Mumbai Police Arrested Stuntman: मुंबई येथील एका इमारतीच्या 23व्या मजल्यावर जीवघेणे स्टंट करणाऱ्या 'त्या' तरूणाला अटक)
या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी.
मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे..
Take Action..@AnilDeshmukhNCP @vishwasnp @PoliceMumbai100 https://t.co/aRfTOVzQDi
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 24, 2020
पोलिसांवरील हल्ले खपवून घेऊ नयेत. राज्य सरकारने अशा हल्लेखोरांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरुन हे हल्लेखोर अशा घटना करण्याचे धाडस करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
दरम्यान, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, हे कृत्य करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली आहे. पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. परंतू, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळकायला हवी. पोलीस अत्यंत तणावांमध्ये काम करत असतात. त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. अशा वेळी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी, असे नांगरे पाटील म्हणाले.