प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indorikar Maharaj) यांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युट्युब चॅनल्स आता अडचणीत सापडणार आहेत. या युट्युब चॅनल्स विरुद्ध खुद्द इंदोरीकर महाराजांनी पुणे येथील स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार 16 जुलै 2020 रोजी दाखल केली होती. त्यानंतर भारतीय तंत्रज्ञान कायदा कलम 66, 66 सी, 43 आय, भा.द.वि.कलम 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोरोना संकटामुळे संथ गतीने सुरु असलेल्या तपासाला आता वेग आला आहे. पोलिसांनी 25 ते 30 युट्युब चॅनल्संना नोटीसा पाठवल्या आहेत.
माझं कोणतंही अधिकृत संकेतस्थळ किंवा युट्युब चॅनल नाही. समाजप्रबोधनासाठी मी कीर्तनं करतो. मात्र युट्युब चॅनलवर माझ्या परवानगीशिवाय व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. तर काही युट्युब चॅनल्सवर अर्वाच्च भाषा वापरण्यात आली आहे. तसंच परवानगी शिवाय माझे व्हिडिओ प्रसारीत करणे आणि त्यात छेडछाड करुन माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे असे इंदोरीकर महाराजांनी तक्रारीत म्हटले आहे.
इंदोरीकर महाराजांच्या पुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त विधानावरु त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यावरुन खटला ही दाखल करण्यात आला. मात्र संगमनेर न्यायालयाने खटला रद्द करत महाराजांना दिलासा दिला. मात्र इंदोरीकर महाराज यांनी युट्युब चॅनल्स या वादाचे कारण असल्याचे म्हटले आहे. युट्युब चॅनल्सनी माझ्या नावावर बक्कळ पैसा कमावला. मी इतकं कष्ट करुन कीर्तन करतो. त्यात एखादं वाक्य चुकीचं गेलं. मुळात ते चुकीचं नाही. भागवतात आणि ज्ञानेश्वरीतही असं म्हटलं आहे. तरी देखील टीका होत असल्याने त्रासलो असून सहनशीलता संपल्याने युट्युब चॅनलविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे.