Indurikar Maharaj (Photo Credits: Facebook)

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना पुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर समर्थकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. दरम्यान, इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्याप्रकरणी पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 अंतर्गत संगमनेरच्या न्यायालात खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर इंदोरीकर महाराज यांनी  प्रोसेस इश्यू विरोधात दाखल केलेले अपील न्यायालयात मंजूर करण्यात आलं आणि खटला रद्द करण्यात आला.

इंदोरीकर महाराजांच्या या वादग्रस्त विधानानंतर सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर PCNDT कायद्याअंतर्गत संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आज अखेर त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अधिक आक्रमक भूमिका घेत या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. (मुला-मुलीच्या जन्माबाबत ऑड-इव्हन फॉर्म्युल्याचे वादग्रस्त विधान करणाऱ्या इंदोरीकर महाराजांविरुद्ध अहमदनगर येथे गुन्हा दाखल)

काय होतं हे प्रकरण?

"स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते." या वक्तव्याच्या व्हिडिओ देखील समोर आला होता. नवी मुंबईतील उरणमध्ये येथे हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची एकच झोड उठली होती. मात्र इंदोरीकर महाराज यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. तसंच या संपूर्ण प्रकरणात महाराजांचे समर्थक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते.