मुला-मुलीच्या जन्माबाबत ऑड-इव्हन फॉर्म्युल्याचे वादग्रस्त विधान करणाऱ्या इंदोरीकर महाराजांविरुद्ध अहमदनगर येथे गुन्हा दाखल
Indurikar Maharaj (Photo Credits: Facebook)

मुला-मुलीच्या जन्माविषयी वादग्रस्त विधान केल्याने इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांच्यावर अहमदनगर (Ahmednagar) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च महिन्यात लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी इंदोरीकर महाराज यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून संगमनेर कोर्टात (Sangamner Court) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त विधान महाराज इंदोरीकर यांनी केले होते. त्यानंतर इंदोरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. तसंच जिल्हा आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर इंदोरीकर महाराज यांनी वकिलामार्फत कालावधीच्या अखेरच्या दिवशी उत्तर दिले होते. (गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन फॉर्म्युला'बाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांची पलटी, असे बोललो नसल्याचा खुलासा)

इंदोरीकर महाराजांची कीर्तने अतिशय प्रसिद्ध आहेत. दरम्यान आपल्या एका कीर्तनात इंदोरीकर महाराज मुलगा-मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत असे म्हटले होते. कीर्तनात इंदोरीकर महाराज म्हणाले, "स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते." या व्यक्तवाच्या व्हिडिओ देखील समोर आला होता.

दरम्यान या वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तसंच कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा करावी असे ते म्हणाले होते. दरम्यान या सगळ्या वादात त्यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पुत्र प्राप्तीविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त करुन देखील महाराजांची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप समर्थक करत आहेत.