CM Uddhav Thackeray, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी आज (5 ऑगस्ट 2020) दुरध्वनी द्वारे चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीबाबत चर्चा केली. मुंबई आणि महाराष्ट्रात आज दिवसभर पाऊस पडत आहे. त्यात मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सकल भागात पाणी साचले. त्याचा परिणाम होऊन वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. तर मुंबईची वाहीनी समजली जाणारी मुंबई लोकलही रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने उभी राहिली. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या वेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी एक बैठक घेतली. या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रातील पावसाचा आढावा घेण्यात आला. आजच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना केल्या. मुंबई शहरात महापालिका, महापौर, महापालिका प्रशासन, पालिका आयुक्त, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांनी समन्वय राखावा. समन्वयाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे. वीज पुरवठा खंडीत होणार नाही. वीज पुरवठा खंडीत झाला तर लगेच तो पूर्ववत होईल. वृक्ष उन्मळने, पडने, साचलेल्या पाण्यांचा निचरा करणे यावर तातडीने कारवाई करावी असे निर्देश दिले. ठिक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनीही सतर्क राहावे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Rain Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना, नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे अवाहन)

दरम्यान, मुंबईत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासूनही पावसाची संततधार कायम आहे. आज रात्री आणि उद्या दिवसभरही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, राज्यातील इतरही काही भागात पावसाची दमदार हजेरी कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर हे चार जिल्हे तसेच घाट परिसरात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे उद्भवणारा धोका या ठिकाणी कायम आहे. प्राप्त माहितीनुसार गेल्या सहा तासात मुंबईत 10 मिमी पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षीत ठिकाणी थांबावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.