मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) 2अ आणि 7 मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने या नवीन मेट्रो मार्गांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम भव्यदिव्य करण्याची योजना आखली आहे. येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या दोन्ही मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असेल. पंतप्रधान मोदी ज्या मेट्रो मार्गांचे उद्घाटन करणार आहेत, त्यांची किंमत 12,600 कोटी रुपये आहे.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला दोन मेट्रो प्रकल्प देशाला सुपूर्द करतील. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांची लांबी 35 किमी आहे. या मेट्रो मार्गांमुळे पश्चिम उपनगरांना फायदा होईल आणि मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न, रहदारीची समस्याही काही प्रमाणात सोडवला जाईल. या मेट्रो मार्गांची पायाभरणीही पंतप्रधानांनी 2015 मध्ये केली होती. या मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो ट्रेन मेड इन इंडिया आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कर्नाटक आणि महाराष्ट्राचा दौरा करणार असून यावेळी ते दोन्ही राज्यांमध्ये सुमारे 49,600 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) मंगळवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान कर्नाटकातील सिंचन, पिण्याचे पाणी आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाशी संबंधित 10,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. (हेही वाचा: दावोस येथे महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी आतापर्यंत सुमारे 88,420 कोटी रुपये गुंतवणूकीचे सामंजस्य करार)
महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मुंबई मेट्रो रेल्वे लाईन 2A आणि 7 राष्ट्राला समर्पित करतील. राजयाते ते 38,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. यामध्ये सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास यांचा समावेश आहे. संध्याकाळी साधारण 5 वाजता पंतप्रधान मुंबईतील अनेक विकास उपक्रमांचे उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन करून त्यातून प्रवासही करतील.
दरम्यान, मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा-1) हा 10.902 किमी लांबीचा उन्नत कॉरिडॉर आहे, ज्यामध्ये 9 स्थानके आहेत (आरे ते दहिसर (पू)) ज्यामधे दहिसर (पू) हे स्थानक मुंबई मेट्रो मार्ग 2अ अंतर्गत येते. मुंबई मेट्रो मार्ग 2अ अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व कॉरिडॉर मुंबईच्या पश्चिमेकडील भागांसाठी अत्यंत उपयुक्त असा मार्ग आहे.