Jashna e diwali | Twitter

दिवाळी (Diwali) अगदीच तोंडावर आली आहे. त्यानिमित्ताने रोषणाईला सुरूवात झाली आहे. मॉल मध्येही आकर्षक रोषणाई केली जाते. कुर्ला च्या फिनिक्स मॉलमध्येही (Phoenix Marketcity Mall Kurla) अशाप्रकारे आकर्षक रोषणाई करत 'जश्न ए दिवाली' चा हॅशटॅग लावण्यात आला होता पण त्याला मनसेने विरोध केल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. चांदिवली विभागाचे प्रमुख मनसे महेंद्र भानुशाली यांनी यावर आक्षेप नोंदवला होता. मनसेच्या विरोधानंतर 'जश्न ए' शब्द काढण्यात आला आहे.

दिवाळी हा हिंदू सण आहे. याला मुस्लिम विचारधारेशी जोडल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. 'हिंदू सणांसाठी विदेशी भाषा वापरणे आपल्या संस्कृतीला नष्ट करण्यासारखे आहे. दिवाळीसोबत ऊर्दू नाव जोडणे विकृत मानसिकता आहे. ' अशी प्रतिक्रिया महेंद्र भानुशाली यांनी दिली आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाली की शुभकामनाएं, हॅपी दिवाली इतपर्यंत ठीक आहे पण 'जश्न ए दिवाळी' हा काय प्रकार आहे? आम्ही कोणत्या धर्माचा अपमान करायचा नाही. ज्या पद्धतीने आमच्या सणांसाठी ऊर्दू शब्द वापरला जातो त्याप्रमाणे इतर धर्मांच्या सणांसाठी जय श्रीराम असे हॅश टॅग लिहिले आहे का? असे म्हणत मॉलमध्ये लावण्यात आलेला हॅश टॅग मागे घेण्यास मनसेने भाग पाडले आहे.

दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे फॅब इंडियाने त्यांच्या दिवाळी कॅम्पेन मध्ये 'जश्न-ए-रिवाज' म्हटलं होतं. त्यावरूनही नेटकरी भडकले होते. अनेकांनी या जाहिरातीनंतर #BoycottFabIndia हा हॅशटॅग ट्रेंड केला होता. त्यानंतर कंपनीने जाहिरात मागे घेतली होती.