पेट्रोल, डिझेल दरवाढ (Petrol Diesel Prices Today) ही मधल्या काळातील अपवाद वगळता एक दंतकथा झाली आहे. आज बुधवारी (23 मार्च) पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली. देशात 23 मार्च रोजी सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर वाढले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 2 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कपात केली आहे. . त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. मात्र, 22 मार्च रोजी तेल विपणन कंपन्यांनी 137 दिवसांनंतर प्रथमच इंधनाचे दर वाढवले.
ताज्या दरवाढीनंतर आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 97.01 रुपये प्रति लीटर झाली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 111.67 रुपये मोजावे लागत आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल 106.34 रुपयांना मिळते आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोलसाठी 102.91 रुपये मोजावे लागत आहेत. (हेही वाचा, Aurangabad: पेट्रोल-डिझेल परवडत नाही, औरंगाबदचा तरुण कामावर जाण्यासाठी वापरतो घोडा; व्हिडिओ व्हायरल)
बुधवारी डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीत, सरकारी मालकीच्या इंधन किरकोळ विक्रेत्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, एक लिटर डिझेलची किंमत प्रति लीटर 88.27 रुपये असेल. मुंबईत एक लिटर डिझेलसाठी तुम्हाला 95.85 रुपये मोजावे लागतात. कोलकातामध्ये एक लिटर डिझेलची किंमत 91.42 रुपये आहे. चेन्नईमध्ये एका लिटर ऑटो इंधनासाठी ग्राहकांना 92.95 रुपये मोजावे लागतात.
भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, रुपया-डॉलर विनिमय दर आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे आकारले जाणारे विविध कर यावर अवलंबून असतात. युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणादरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक वाढ झाल्याने तेल विपणन कंपन्यांनी भारतात इंधनाच्या किमती वाढवण्यास प्रवृत्त केले आहे.