..तर लोकहो, आज पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले!; पाहा आजचा भाव
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

सततच्या वाढत्या दरवाढीतून जनतेला काहीतरी दिलासा मिळावा यासाठी केंद्र आणि राज्यसरकारांनी पेट्रोल, डिझेल दरात पाच रुपयांची कपात केली. जनतेसाठी हा दिलासा औटघटकेचाच ठरला आहे. कारण, पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेल दरात अनुक्रमे प्रति लीटर २३ आणि ३१ पैशांनी वाढ झालीआहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८७.७३ रुपये तर, डिझेल प्रति लीटर ७७.६८ रुपयांनी विकले जात आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतही पेट्रोल, डिझेल दरात वाढच झाली असून, तिथे पेट्रोल प्रति लीटर २३ तर, डझिले प्रति लीटर २९ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे दिल्लीतील पेट्रोल, डिझेलचा प्रति लीटर दर अनुक्रमे ८२.२६ रुपये आणि ७४.११ रुपये असा झाला आहे.

पेट्रोलसाठी महाराष्ट्रातून गुजरातकडे

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर ८७ ते ८८ रुपये दरांनी विकले जात आहे. मात्र, महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या गुजरातमध्ये हेच पेट्रोल ८० रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत असलेले अनेक वाहनचालक आपली वाहने घेऊन गुजातच्या हद्दीतील पेट्रोलपंपांवर हजेरी लावत आहेत. तसेच, काही कारणांमुळे गुजरातकडे प्रवास करणारे वाहनचालकही महाराष्ट्रात पेट्रल भरून गुजरातला जाण्याऐवजी थेट गुजरातमध्ये जाऊनच वाहनात पेट्रोल भरण्यास प्राधान्य देत आहेत.

डिझेलसाठी गुजरातमधून महाराष्ट्राकडे

दरम्यान, स्वस्त पेट्रोलसाठी वाहनचालक महाराष्ट्रातून गुजरातकडे जात असले तरी, डिझेलच्या बाबतीत मात्र याच्या विरोधात चित्र पाहायला मिळत आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे गुजरातमधील अनेक वाहनचालक डिझेल भरण्यासाठी महाराष्ट्राला प्राधान्य देत आहेत. प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, सीमेलगत असलेल्या चारोटी येथे डिझेल प्रति लीटर ७६.४४ रुपयांनी विकले जात आहे. तर, हेच डिझेल गुजरातमधील वापी येथे प्रति लीटर ७८.०६ रुपयांनी विकले जात आहे.