गेल्या काही दिवसांमध्ये देशात पेट्रोल (Petrol) आणि डीझेलच्या (Diesel) किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दराने तर उच्चांकी दर गाठला आहे. याबाबत एकीकडे केंद्र सरकारवर टीका होत आहे तर दुसरीकडे राज्य सरकार महाराष्ट्रात हे दर कसे कमी होतील याचा विचार करत आहे. राज्यात 8 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता आहे. एबीपी माझाने अर्थखात्यातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 2021 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 1 मार्च 2021 ते 10 मार्च 2021 दरम्यान, मुंबई येथे होणार आहे.
अर्थसंकल्पामध्ये, पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते. यामुळे राज्यातील पेट्रोल-डीझेल दर थोड्याफार प्रमाणात कमी होतील. राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि सरकारच्या तिजोरीवरील भार थोडाफार हलका करण्यासाठी, तत्कालीन राज्य सरकारने 2018 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर ‘दुष्काळ कर’ म्हणून 2 रुपये सेस आकारला होता. सध्या दुष्काळ नाही मात्र अजूनही हा दोन रुपये सेस अजूनही आकाराला जात आहे. (हेही वाचा: कोरोना पार्श्वभूमीवर पालकांची अडचण समजून घेत शाळांनी यावर्षी फी वाढवू नये - उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
हाच सेस कमी करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे, जेणेकरून इंधनाचे दरही कमी होतील. सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. त्यानंतर पुढे राज्य सरकारही त्यावर विविध कर आकारात असते.