पार्थ पवार (Photo Credit : Youtube)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पवार घराण्यातील एक नवे सदस्य रिंगणात उतरले आहेत ते म्हणजे पार्थ पवार (Parth Pawar). अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांना मावळ प्रांतातातून उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या सर्वच ठिकाणी उमेदवार प्रचारासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत आहेत. अशात पार्थ पवार यांचा चक्क घोड्यावर बसून प्रचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गुरुवारी चिंचवड बाजार पेठेत त्यांनी घोड्यावर बसून प्रचार केला आहे. याआधी पार्थ पवार यांनी रिक्षा, रेल्वे, बैलगाडी यामधून प्रवास कसून सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

आपल्या पहिल्या भाषणामुळे पार्थ पवार चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर त्यांचा पनवेल येथे सभेसाठी उशीर होत आहे म्हणून धावत असतानाचा व्हिडीओ गाजला आणि आता घोड्यावरील प्रचाराची हटके युक्ती चर्चेचा विषय ठरत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील बाजार पेठेत प्रचारासाठी आलेले पार्थ पवार चक्क फेटा घालून घोड्यावर स्वार झाले आणि चिंचवड बाजारपेठेचा फेरफटका मारला. (हेही वाचा: पनवेल येथे प्रचारासाठी उशिर होतोय म्हणून पार्थ पवार यांची पळापळ)

उस्मानाबादचे राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांनी देखील अनेकवेळा घोड्यावरून प्रचार केला आहे. आता पार्थ यांनी आपल्या मामाची स्टाईल कॉपी केल्याने त्यांना पाहायलाही बरीच गर्दी जमली होती.