Rohit Pawar, Parth Pawar, Ram Shinde | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Karjat Jamkhed Assembly Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काका विरुद्ध पुतण्या असा सामना शरद पवार आणि अजित पवार यांच्या पाहायला मिळत आहे. या संघर्षाला सुप्रिया सुळे विरुद्ध दादा अशीही किनार आहे. असे असतानाच आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) विरुद्ध पार्थ असाही राजकीय डाव पाहायला मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. निमित्त ठरले आहे भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या घरी असलेला कार्यक्रम. शिंदे यांच्या फराळाच्या कार्यक्रमानिमित्त कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात चक्क पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार?

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार का? अशी चर्चा असतानाच आता रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्येही पार्थ पवार यांच्या स्वागताचे बॅनर झळकल्याने इथेही पवार विरुद्ध पवार राजकीय संघर्ष पाहायला मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, या चर्चेमुळे असा संघर्ष झाला तर मग राम शिंदे यांचे काय? असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खरे तर कर्जत जामखेड हा प्रा. राम शिंदे यांचा मतदारसंघ. या मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर विधानसभेवर 2014 मध्ये निवडून गेले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मंत्रीही राहिले. मात्र, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मात्र वातावरण बदलले.

रोहित पवार यांची मोर्चेबांधणी

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोहित पवार यांना मैदानात उतरवले. विद्यमान आमदार, मंत्री आणि भाजप नेता राम शिंदे यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. तेव्हापासून राम शिंदे आणि रोहित पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो आहे. राम शिंदे यांनी नेहमची या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आणि जिंकण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

व्हिडिओ

राम शिंदे यांचे काय?

दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात जर पवार विरुद्ध पवार (रोहिती आणि पार्थ) असा सामना रंगला तर राम शिंदे यांच्यासाठी ती धोक्याची घंटा असणार आहे. मात्र, हे राजकारण आहे. राजकारणात शह काटशाहचे राजकारण सुरु असते. त्यामुळे विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी अनेक खेळ्या केल्या जातात. या खेळी मध्ये राम शिंदे यांचे काय होणार? त्यांचा मतदारसंघ सुरक्षीत राहणार की त्यांना दुसरा नवा मतदारसंघ शोधावा लागणा की, पक्ष नेतृत्व त्यांना लोकसभा किंवा विधानरिषदेची संधी देऊन सुरक्षीत करणार याबाबत उत्सुकता आहे.