Param Bir Singh: परमबीर सिंह पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात; तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप
Param Bir Singh (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai's Former Police Commissioner Parambir Singh) यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल (Anil Deshmukh) देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. परम बीर सिंह (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे की, अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच, आपल्याविरुद्ध सुरु असलेली चौकशी दुसऱ्या राज्यात हस्तांतरीत करावी अशी मागणीही परमबीर सिंह यांनी केली आहे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्यावर जेही आरोप आहेत किंवा सुरु असलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआय किंवा तशाच प्रकारच्या दुसऱ्या राज्यातील स्वतंत्र यंत्रणेद्वारे करण्यात यावी. त्यासाठी ही प्रकरणे राज्याबाहेर तशा यंत्रणांकडे हस्तांतरीत करावीत. तसेच, महाराष्ट्र सरकारला जर त्यांच्या विरुद्ध कोणतीही चौकशी अथवा त्यांच्याबाबत कोणते पाऊल टाकायचे असेल तर त्यापासून सर्वोच्च न्यायालयाने रोखावे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि विद्यमान होमगार्ड डीजी परमबीर सिंह यांच्यासहु 33 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्याकडून न्यायालयात नवी याचिका; तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप)

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरुन अकोला शहरातील पोलीस स्टेशनमध्ये एका प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत परमबीर सिंह आणि मुंबई EOW चे डीसीपी पराग मनेरे यांच्यासह 33 जणांना आरोपी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वांविरुद्ध 27 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारकर्ता असलेले पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी आरोप केला आहे की, ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांनी आरोपींना वाचविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता. तसेच, हा दबाव झुगारुन दिला असता आपला मानसिक छळ करण्यात आला. तसेच, आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले.