Pankaja Munde | (Photo Credit - Facebook)

भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या त्यांनी केलेल्या विधानामुळे जोरदार चर्चेत आल्या आहेत. आपण भाजपच्या आहोत. भाजप आपला थोडीच आहे? असं म्हणत त्यांनी सूचक विधान केले आहे. तसेच, जर काहीच मिळालं नाही तर कोयता घेऊन ऊस तोडायला जाईन, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला लोक म्हणतात इकडे जाणार की तिकडे जाणार.. वेळ आलीच तर मी माझ्या भावाच्या म्हणजेच महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या पक्षात (Rashtriya Samaj Paksha) जाईल. कारण तो माझा माहेरचा पक्ष आहे, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाकडून दिल्ली येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंकजामुंडे बोलत होत्या.

पंकजा मुंडे यांनी निर्णय घ्यवा- संजय राऊत

पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानाचे अनेक वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पंकजा मुंडे यांच्या विधानाची दखल घेत शिवसेना (UBT) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या रक्तात लढावू वृत्ती आहे. गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचे पाणी करुन भारतीय जतना पक्ष महाराष्ट्रात वाढवला. पण त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न भाजप आणि दिल्ली येथून सुरु आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी कोणत्याही परिणामांची चिंता न करता थेट निर्णय घ्यावा. नाहीतर त्या रडगाण्याला काही अर्थ उलत नाही, असे संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, 'सरकारनं कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता', भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची खंत)

प्रीतम मुंडे यांचा घरचा आहेर

पंकजा मुंडे यांच्या विधानाची चर्चा असतानाच भाजप खासदार आणि पंकजा यांच्या भगिणी प्रीतम मुंडे यासुद्धा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आहेत. दिल्ली येथे सुरु असलेल्या कुस्तीगिरांच्या आंदोलनाला प्रीतम मुंडे यांनी समर्थन दिले आहे. सरकारने खेळाडूंच्या तक्रारीची दखल घ्यायला हवी होती. पण त्यांचे म्हणने ऐकले गेले नसल्याची खंत प्रीतम मुंडे यांनी बोलून दाखवली. खासदार प्रीतम मुंडे या पहिल्या भाजप खासदार आहेत. ज्यांनी दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

 पंकजा मुंडे यांचं नेमकं चाललंय काय? 

दरम्यान, पंकजा मुंडे यांची एकूण विधाने पाहिली तर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा पाठिमागील अनेक वर्षांपासून आहे. मग तो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बाहेर आलेला चिक्की घोटाळा असो,विधानसभा निवडणूकीत त्यांचा झालेला पराभव असो की, विधानपरिषेसाठी त्यांना नाकारलेले तिकीट असो, सर्वच गोष्टींमुळे पंकजा आणि पर्यायाने गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबीयांचे भाजपमधून उच्चाटन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता प्रितम मुंडे यांचे वक्तव्य त्यानंतर पंकजा मुंडे यांनी केलेली सूचक विधाने पाहता त्यांचे चाललेय तरी काय असा प्रश्न विचारला जातो आहे.