राज्याच्या राजकारणाचा झालेला विचका आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा ठरतो आहे. त्यामुळे राजकीय आखाड्यातील डाव-प्रतिडाव, शहकाटशह देण्यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या भावाबहीणत समेट घडवून आणला आहे काय? अशी चर्चा परळी आणि बीड(Beed Lok Sabha) जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात पाहायला मिळते आहे. त्याला निमित्त ठरला आहे परळी येथे नुकताच पार पडलेला शासन आपल्या दारी कार्यक्रम.
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात भावा-बहीणची उपस्थिती
शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर होते. या वेळी आणखी दोन नेत्यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. हे दोन नेते म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे. या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यंनी गोपीनाथ गडावर हजेरी लावली. या वेळी त्यांच्यासोबत धनंजय आणि पंकजा अशा दोघांचीही उपस्थिती होती. (हेही वाचा, Pankaja Munde Dasara Melava 2023: पंकजा मुंडे यांचा मोनिका राजळे यांच्या मतदारसंघावर दावा? सावरगाव येथील दसरा मेळ्याव्यात महत्त्वाचे वक्तव्य)
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद
दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमात स्टेजवर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असेलला दिलखुलास संवाद हा बरेच काही सांगून जाणारा होता. अनेकांनी या संवादाचा अर्थ पंकजा यांची नाराजी दूर करण्यास भाजपला यश आल्याचा काढला आहे तर. राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे यांना लोकसभा आणि धनंजय मुंडे यांना विधानसभा अशी विभागणी झाल्याचेही चर्चा सुरु झाली आहे. मुंडे बंदू भगिनींनी व्यासपीठावरुन केलेली वक्तव्येही एकमेकांना पूरक अशी होती. त्यामुळे महायुतीचे जागावाटप झाले की काय, अशी चर्चा सुरु आहे.
एक कुटुंब एक पद असे भाजपचे धोरण
दरम्यान, एक कुटुंब एक पद असे भाजपचे धोरण आहे. ते धोरण पाहता पंकजा मुंडे यांच्या भगीणी प्रीतम मुंडे या लोकसभा खासदार आहेत. पंकजा यांचा विधानसभेला पराभव झाला अन्यथा त्यासुद्धा आमदार असत्या. त्यामुळे या धोरणाचा विचार करता विद्यमान आमदार असलेल्या धनंजय यांना विधानसभेवर आणि पंकजा यांना लोकसभेवर पाठवावे, असे धोरण असल्याचे दिसते.
राज्याच्या राजकारणात प्रभावशाली असलेल्या कुटुंबामध्ये गपीनाथ मुंडे कुटुंबाचाही समावेश आहे. त्यातच कुटुंबामध्येच लढत होत असल्याने बीड आणि परळीडे राज्याचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे कोणालाही पराभवाचा धक्का लागू नये आणि उमेदवार तर निवडून यावा यासाठी महायुतीने बहीण भावंडामध्ये दिलजमाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अर्थात या चर्चा किती खऱ्या किती खोट्या याबाबत प्रत्यक्षा निवडणुका जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.