Pankaja Munde | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भाजप आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या विधानसभा मतदार संघावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा डोळा आहे की काय? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. सावरगाव येथील दसरा (Pankaja Munde Dasara Melava 2023) मेळाव्यातून बोलताना पंकजा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला उधान आले आहे. या मेळाव्यातून बोलताना पंकजा मुंडे या मंत्रिपद असताना केलेल्या कामांबाबत बोलत होत्या. या वेळी बोलताना व्यासपिठावर असलेल्या मनिका राजळे यांच्याकडे पाहात पंकजा म्हणाल्या, मोनिका तुमचा मतदारसंघ मी माझाच मानते. या वक्तव्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मुंडे समर्थक दाखल झाले होते. या वेळी बोलताना त्या काहीशा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपमध्ये नेतृत्वाकडून डावलली जाणारी संधी आणि राज्यातील नेतृत्वाकडून होणारी कोंडी पाहता, त्यांनी आता काही वेगळा निर्णय घ्यावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे एका बाजूला कार्यकर्त्यांच्या भावनेचा रेटा दुसऱ्या बाजूला पक्षनिष्ठा अशा विचित्र कात्रीत सापडलेल्या पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याबाबत सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता तशीच कायम राहीली.

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असून लवकरच त्या पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. मात्र, केवळ स्वार्थासाठी पक्ष बदलावा इतकी माझी पक्षनिष्ठा लेचीपेची नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता आपण महाराष्ट्रभर फिरणार आहोत. राजकारणामध्ये पराभव होत असतो. माझाही झाला. मी पडले. होय, राजकारणामध्ये हे चालतंच. पण आता मी ठरवलं. आता पडायचं नाही पाडायचं. मी पाडणार आहे. जे लोक बेरोजरागीर दूर करु शकत नाही त्यांना पाडणार. जो भ्रष्टाचारी असेल त्याला पाडणार. जो शेतकऱ्यांवर अन्याय करतो, त्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देत नाही, अशांना मी पाडणार असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, महाराष्ट्राला सध्या जाती-जातींमध्ये रुंदावलेली दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. ही दरी कमी करण्यासाठीच मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. आता मी घरी बसणार नाही. कारखान्याला नोटीस आली तेव्हा तुम्ही सर्वांनी 11 कोटी रुपये जमा केले. माझ्या मुलाचा मला विदेशातून फोन आला. या लोकांनी येवढे पैसे जमा केले आहेत. तुझा विचार काय आहे? मी त्याला सांगितले, हे माझे लोक आहेत. मी त्यांचे पैसे घेणार नाही. पण त्यांनी दिलेले आशीर्वाद मी नक्की घेईन. त्याच वेळी मी त्याला हेसुद्धा सांगितले की, तू माझा मुलगा आहेस. तुझ्यावर माझे प्रेम आहे. पण तू एकटाच नाहीस. ही समोर असलेली जनताही माझी आहे. त्यामुळे या जनतेवर काकणभर माझे अधिक प्रेम आहे. त्यामुळे आगोदर ही जनता आणि त्यानंतर तू असशी, असे मी त्याला ठणकावून सांगितल्याचे पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.