कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मंदिरात ऑनलाईन पासेस (Online Passes) अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी जाण्यापूर्वी ऑनलाईन पासेस घ्यावे लागतात. त्यामुळे राज्यातून तसेच परराज्यातून येणा-या भाविकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागायचे. तसेच ऑनलाईन पास नसल्याने निराशा व्हायची. मात्र यामुळे येथे येणा-या भाविकांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ABP माझाने दिलेल्या माहितीनुसार, आता पंढरपूरात (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ऑनलाईन पासशिवाय विठोबाचे दर्शन घेता येणार आहे.
यासाठी कोरोना संबंधी घालून दिलेल्या नियमात काही बदल येथील मंदिर समितीने केले आहेत. कोरोनाचा धोका लक्षात पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात रोज केवळ 4200 ते 4800 भाविकांना दर्शन घेता येत होते. ते आता जवळपास 8000 पर्यंत केले आहे. त्यामुळे तुमच्याकडे ऑनलाईन पास नसेल तरी देखील तुम्ही विठुरायाचे दर्शन घेऊ शकता.हेदेखील वाचा- Pandharpur Vitthal Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी जाताना 'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य
त्याचबरोबर येथे वयाची अट कायम ठेवण्यात आली असून 65 वर्षांच्या आत असलेल्या भाविकांनी आपले वय स्पष्ट करणारे आधारकार्ड वा अन्य ओळखपत्र दाखवून विठुरायाचे दर्शन घेऊ शकतात. अशा भाविकांना ओळखपत्र दाखवून आत सोडण्यात येईल. कोरोनासंबंधीची काळजी म्हणून सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे, हात सॅनिटाईज करणे या नियमांचे पालन करणे मात्र अनिवार्य आहे. तसेच 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी दर्शनासाठी येणे टाळावे असेही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाताना या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसंच मंदिर समितीकडून विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे.