कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर गेले 8 महिने बंद असलेली राज्यातील मंदिरं, धार्मिक स्थळं दिवाळी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पुन्हा सुरु करण्यात आली. या निर्णयामुळे भाविक आनंदून गेले आहेत. मात्र त्यासाठी काही विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही दर्शनासाठी जाताना मंदिर समितीकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना ऑनलाईन बुकींग (Online Booking) करावे लागणार आहे. दररोज 2000 भाविकांना दर्शन घेता येणार असून दर्शन बुकिंगसाठी स्लॉट ठरवून देण्यात आले आहेत. (सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी, तुळजाभवानी मंदिरामध्ये 'हे' असतील महत्त्वाचे नियम)
सकाळी 6-7, 8-9, 10-11, 11-12, 12-1, दुपारी 2-3, 3-4, 5-6, सायंकाळी 7-8 आणि रात्री 8-9 या कालावधीत प्रत्येकी 200 भाविक विठ्ठल दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी ही संख्या 100 इतकी होती. मात्र भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहता क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्त पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट, Watch Video)
# यासाठी किमान 24 तास आधी बुकींग करणे आवश्यक असणार आहे. तसंच पुढील 8 दिवसांपर्यंतचे बुकींग भाविकांना करता येईल.
# बुकींग करण्यासाठी भाविकांना www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
# मुख दर्शनाकरिता कासार घाट येथे पास तपासणी करून दर्शनाला सोडले जाणार.
# दर्शनमंडप पूर्व गेट येथे स्कॅनरद्वारे बॅग/साहित्य तपासणी होईल. मोबाईल लॉकरमध्ये ठेवावे लागतील.
# थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी तपासली जाईल.
# सर्दी, खोकला, ताप किंवा इतर कोरोनाची लक्षणे आढळल्यास भाविकांना बाहेर काढण्यात येईल.
# दर्शनरांगेत सामाजिक अंतर ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आलेले आहे.
# सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली इत्यादी व्यवस्था मंदिर समितीकडून देण्यात येणार आहे,
# अन्नछत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहील.
# ऑनलाईक बुकींगद्वारे केवळ मुखदर्शन सुविधा प्राप्त होईल.
# मास्क परिधान करणे.
# दर्शनरांगेत दोन भाविकांमध्ये 6 फूट अंतर ठेवणे
# हाताला सॅनिटायझर लावणे.
# तसेच 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी दर्शनासाठी येणे टाळावे.
पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाताना या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसंच मंदिर समितीकडून विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे.