पालघर (Palghar) जिल्ह्याला आज (26 डिसेंबर) सकाळी भूकंपाचा धक्का (Earthquake) बसला आहे. सकाळी 3.9 रिश्टल स्केलच्या धक्क्यांनी हा परिसर हादरला आहे. सुदैवाने या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच वित्तहानी देखील झाली नसल्याची माहिती पालघर जिल्ह्याचे आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले आहे.
पालघर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के सकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी जाणवल्याची माहिती देण्यात आली आहे. पालघर हा राज्यातील भूकंप प्रवण भाग आहे. नोव्हेंबर 2018 पासून तलासरी तालुक्यात असणार्या दुंदलवाडी गाव आणि डहाणू मधील देखील काही लहान सहान गावांमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवतात. पण आज दोन महिन्यांनी पुन्हा हा भाग भूकंपाने हादरला आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला देखील पालघर जिल्ह्यामधील डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ४.0 रिक्टर स्केलचा पहिला तर ३ वाजून ५७ मिनीटांनी ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का बसला असल्याची माहिती देण्यात आली होती. जून 2021 मध्ये डहाणू आणि तलासरीला भूकंप दोनदा जाणवला आहे. यामुळे काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण असतं. महाराष्ट्र सरकार कडून या भागात खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय इमारती, कार्यालयं, आश्रमशाळा सोबत घरांचेही मजबुतीकरण करण्यात आले आहे.