Car Accident On Eastern Express Highway: इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कार अपघातात एकाचा मृत्यू, 4 जण जखमी
Accident (PC - File Photo)

Car Accident On Eastern Express Highway: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) पुलाजवळ रविवारी सकाळी इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Eastern Express Highway) कारला झालेल्या अपघातात (Car Accident) एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. व्यवसायाने चालक अविनाश गायकवाड, राज शिंदे, संदीप खोपले, सूरज तोरणे आणि रितेश सिंग हे पाच जण ठाण्यात येऊर हिल्स येथे वाढदिवसाच्या पार्टीतून परतत असताना हा अपघात झाला.

गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबरला शिंदे यांनी त्यांना चेंबूर येथे बैठकीला जाण्यासाठी नियुक्त केले. यावेळी खोपले व तोरणे शिंदे यांच्यासोबत निघाले. बैठक आटोपल्यानंतर त्यांनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी येऊर हिल्सला जाण्याचा निर्णय घेतला. सायन कोळीवाड्यात राहणारा रितेश सिंग त्यांच्यात सामील झाला. (हेही वाचा -Thane: ठाण्यातील तरुणाला ऑनलाइन शॉपिंग करण पडलं महागात; 46 हजार रुपयांचा स्मार्टफोन ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरीमध्ये मिळाला साबण)

रविवारी पहाटे पाच जणांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी गाडी चालवण्याचा आग्रह धरला. शिंदे शेजारी बसले तर बाकीचे मागे होते. पहाटे 4.30 च्या सुमारास, वाहन ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असताना, सिंग यांनी वेगात गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

पोलिसांची गाडी काही वेळातच घटनास्थळी आली आणि त्यांनी पाच जणांना राजावाडी रुग्णालयात नेले. डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झालेल्या खोपले यांना वाचवता आले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. उर्वरित चार जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, सिंह, जो कार चालवत होता, त्याच्यावर कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग), 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 377 (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृत्यामुळे दुखापत करणे), 338 (कृत्याने गंभीर दुखापत करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.