महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वाढल्याचं दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलवण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. याचं पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी एका शिफ्ट ऐवजी 2 शिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, तरीदेखील मंत्रालयातील गर्दी कमी होत नव्हती. परिणामी आता ठाकरे सरकारने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. (वाचा - Mumbai Night Curfew: मुंबईत नाईट कर्फ्यू बद्दल पुढील 48 तासात निर्णय घेतला जाणार, फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार- महापौर किशोरी पेडणेकर)
दरम्यान, रविवारी राज्यात आज 16,620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच नवीन 8861 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण 2134072 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे.
याशिवाय रविवारी मुंबई शहरात 1,963 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून पुण्यात 1,780, औरंगाबादमध्ये 752, नांदेड 351, पिंपरी-चिंचवड 806, अमरावती शहरात 209 आणि नागपूर शहरात 1,976 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.