महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन रूग्ण (Omicron) असल्याने आता आरोग्य प्रशासन अलर्ट मोड वर येऊन कामाला लागलं आहे तर नागरिकांच्या मनातही पुन्हा कोरोना वायरस बद्दल धास्ती वाढली आहे. झपाट्याने वाढणारा कोरोना रूग्णसंख्येचा आकडा मनात धडकी भरवणारा आहे पण त्यापाठोपाठ आता हे संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा सरकार 'लॉकडाऊन' (Lockdown) लावणार का? हा प्रश्न देखील उभा ठाकला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) आज याबद्दल माहिती देताना अद्याप लॉकडाऊन लावण्याचा निर्णय नाही असं स्पष्ट केले आहे.
राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नसला तरीही आता निर्बंध कडक करण्याला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यात लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन सदृश्य निर्बंध कधी लावणार याच्या निकषांची देखील आज माहिती देण्ययत आली आहे. राज्यात मेडिकल ऑक्सिजनची मागणी 800 मेट्रिक टन्स प्रतिदिन इतकी वाढेल किंवा 40% कोविड बेड्स भरले जातील तेव्हा लॉकडाऊनचा विचार केला जाऊ शकतो असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच सध्याची स्थिती पाहता फेब्रुवारीच्या मध्यावर राज्यात कोरोनाचं हे संकट पीक वर असेल आणि मार्च मध्यावर रूग्णसंख्या हळूहळू कमी होईल असे देखील सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
This current surge (in COVID cases) may peak in mid February and may subside by mid March: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) January 6, 2022
महाराष्ट्रात कोविड सॅम्पल्स मधील 55% सॅम्पल्स हे ओमिक्रॉनचे असल्याचं समोर आल्यानंतर आता जिनोम सिक्वेंसिंग थांबवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या आठवड्यात सिरो सर्व्हे करून राज्यातील जनतेच्या शरीरातील अॅन्टिबॉडिजचा अंदाज घेतला जाऊ शकतो.
महाराष्ट्रात काल कोविड 19च्या 26,538 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 8 मृत्यू झाले असून, 5,331 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये 87,505 सक्रीय रुग्णाच्यावर उपचार सुरु आहेत. ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 797 वर पोहोचली आहे. यातील 330 रुग्ण डिस्चार्ज देखील झाले आहेत.