MHADA House: दिलासादायक! आता म्हाडाचे घर मिळणे झाले आणखी सोपे; अवघ्या सहा कागदपत्रांची आवश्यकता, पहा यादी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Facebook)

राज्यातील जनतेला आपल्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी म्हाडा (MHADA) प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण हे राज्यातील विविध उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देते. राज्यातील अनेक शहरांमध्ये लाखो लोकांना याचा फायदा झाला आहे. आता म्हाडाचे घर मिळण्याची प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. म्हाडाने कागदपत्रांची संख्या 21 वरून केवळ सहा ते सात केली आहे. त्यामुळे प्रदीर्घ आणि त्रासदायक प्रक्रियेतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

फ्रीप्रेसजर्नलच्या अहवालानुसार, म्हाडाच्या सोडती प्रक्रियेत, अर्जदाराची पात्रता सोडतीनंतर निश्चित करण्यात आली. अर्ज भरताना 21 कागदपत्रे जोडणे आवश्यक होते. मात्र, आता म्हाडाने ही प्रक्रिया एका अॅपद्वारे आणि कमी कागदोपत्री राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाच्या नव्या प्रणालीनुसार अर्जदाराची पात्रता आता सोडतीपूर्वी ऑनलाइन रापासली जाणार आहे. त्यासाठी फक्त सात कागदपत्रे लागणार आहेत. अर्जदाराने जोडलेली कागदपत्रे डीजी लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली जातील. घरे मिळण्याबाबतची माहिती अर्जदाराला एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाईल. (हेही वाचा: समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या 300 मजुरांना मिळाला नाही गेल्या 5 महिन्यांपासून पगार; कामगारांनी सुरु केले आंदोलन)

आवश्यक कागदपत्रे-

  1. ओळख पुरावा- आधार कार्ड (मोबाइल नंबर आधारशी लिंक करणे आवश्यक आहे), पॅन कार्ड
  2. स्वयंघोषणा (Self Declaration)
  3. सध्याच्या वास्तव्याचा पुरावा- अर्जदाराच्या आधार कार्डावरील पत्ता सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास, अर्जदाराने सध्याचा पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.
  4. महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र- तहसीलदाराने दिलेले प्रमाणपत्र
  5. स्वतःच्या उत्पन्नाचा पुरावा- इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला.

    जोडीदाराचा उत्पन्नाचा पुरावा- जोडीदार नोकरीत असल्यास जोडीदाराचे आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराने जारी केलेले उत्पन्नाचा पुरावा आणि स्वघोषणा पत्र

  6. जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर श्रेणीनिहाय प्रमाणपत्र

दरम्यान, म्हाडाची लॉटरी प्रणाली समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. म्हाडा लॉटरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकता.

(टीप- वरील माहिती फ्री प्रेस जर्नलच्या अहवालावर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या)