नुकतेच देशातील एक महत्वाचा मार्ग समजल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Balasaheb Thackeray Samruddhi Highway) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबई-नागपूर दरम्यान असलेल्या या महामार्गावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामुळे नागपूर व मुंबई यांमधील अंतर अतिशय कमी झाले आहे, ज्याचा फायदा अनेक जिल्ह्यांना होत आहे. मात्र या महामार्गासाठी काम करणाऱ्या रोडवेज सोल्युशन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून आपल्या कामगारांना पगार दिला नसल्याचा आरोप होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पॅकेज सात या विभागातील तीनशेच्या वर कामगारांनी गेल्या पाच महिन्यांपासून आपला पगार मिळाला नसल्याने आंदोलन सुरू केले आहे. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी असून या मजुरांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेडच्या माध्यमातून समृद्धी रोडवर हजारो मजूर काम करत होते.
या मजुरांनी रात्रंदिवस काम करूनही त्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळेच तीनशे मजुरांनी 15 किमी पायी चालत किंगोराजा गाठले आणि काल सायंकाळी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र या कामगार मोर्चाला पोलिसांनी राहेरी नदीच्या पुलावर थांबवून कंपनीच्या जबाबदार लोकांशी चर्चा केली. पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात पगार जमा होईल, असे कंपनीने सांगितले. मात्र कामगारांनी संप सुरू केला आहे. आमचे पगार मिळेपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. (हेही वाचा: कोरोना विरोधात लढण्यासाठी पोषक आहार घ्या- महाराष्ट्र सरकार)
कंपनीचे जे.पी.सिंग यांच्याशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पैसे दिले नसल्यामुळे मजुरांना पगार मिळू शकला नाही. त्यामुळे या 300 मजुरांचे अडीच कोटी रुपये थकीत असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. सिंग म्हणतात की, कार्यकर्त्यांनी धीर धरावा. पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या या 300 मजुरांना त्यांची मजुरी कधी मिळणार याकडे आता त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.