औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. नामकरणाच्या मुद्द्यावरून अनेक राजकीय पक्ष आपली भुमिका मांडताना दिसत आहेत. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, यासाठी भाजपकडून अधिक जोर दिला जात आहे. तर, महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून या नामांतराला विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीदेखील उडी घेतली आहे. तसेच औरंगाबाद ऐवजी पुणे (Pune) जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
"भाजप-शिवसेना पाच वर्ष सरकारमध्ये होते. त्यावेळी त्यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण का केले नाही? औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. यापुढे ऐतिहासिक राहायला हवे आहे. मुघलाच्या काळात औरंगाबाद राज्याची दुसरी राजधानी होती", असे प्रकाश आंबेडकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. तसेच "संभाजी महाराज यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. पुण्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचे स्मरण राहावे, असे वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचे नाव दिले तर अधिक उचित होईल", असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Shiv Din 2021: 'शिवराज्याभिषेक दिन' नव्हे राज्यात आता साजरा होणार 'शिवस्वराज्य दिन'
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे हा अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगत नामकरणाची मागणी केली आहे. परंतु, औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आली असताना राजकीय पक्षांकडून औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यात भाजप आघाडीवर आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.