राज्यात आजवर 'शिवराज्याभिषेक दिन ( Shivrajyabhishek Din) ' म्हणून साजरा होणारा 6 जून हा दिवस यापुढे 'शिवस्वराज्य दिन' (Shiv Swarajya Din) म्हणून साजरा होणार आहे. त्यासोबतच यापुढे या दिवशी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिष कार्यालयांवर भगवी गुडीही उभारली जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. या दिवशी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे हा सोहळा आयोजित केला जातो. शिवराज्याभिषेक दिन हा हाष्ट्र सण आणि लोकोत्सव व्हावा अशी या समितीची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शिवराज्याभिषेक दिन यापुढे स्वराज्य दिन म्हणून साजरा होणार या निर्णयामुळे शिवप्रेमी, इतिहास संशोधक यांच्यासह अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे छत्रपतींचे कार्य घराघरात पोहोचेल. त्यांच्या इतिहास आणि कार्य कर्तृत्वाबद्दल जनतेला अधिक माहिती कळेल. इतिहास पुन्हा एकदा अधोरेखीत होईल, अशी भावना इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत. (हेही वाचा, Shivrajyabhishek Din 2020: शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये खास होत्या 'या' गोष्टी!)
शिवाजी महाराजांच्या इतिहासात शिवराज्याभिषेकाला मोठे महत्त्व आहे. या राज्याभिषेकाची तयारी कित्येक महिने सुरु होती. त्यापूर्वी राज्याभिषेक करण्याबाबत विशेष अशी कोणतीच परंपरा नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तत्कालीन अभ्यासकांनी प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील विविध ग्रंथ, कागदपत्रे आदींचा अभ्यास केला. या अभ्यासातून राज्याभिषेकाबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर शिवराज्याभिषेक करण्यात आला असा दाखला इतिहासात मिळतो.