पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळाले आहे. परंतु, भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना डावलण्यात आले. मंत्रिमंडळ विस्तारावर आपण नाराज नसल्याचे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांनी भूमिका मांडल्यानंतर काही तासांतच त्यांच्या समर्थकांनी मुंडे भगिनींना डावलले जात असल्याचा आरोप करत राजीनामास्त्र उगारल आहे. बीड, जालना, पिंपरी-चिंचवडनंतर या राजीनाम्याचे सत्र अहमदनगर मध्ये ही पोहोचले आहे.
बीडमध्ये आतापर्यंत 36 पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनामा सत्रांमुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून जिल्हा पदाधिकारी यांच्यात तीव्र नाराजी दिसत आहे. जालन्याच्या भाजप युवा मोर्चा जिल्हा संयोजिका आश्विनी आंधळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तर, भाजप ओबीसी मोर्चा अंबड तालुकाध्यक्ष ईशवर घाईत यांनीही राजीनामा दिला असून अनेक मुंडे समर्थक राजीनामाच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- Union Ministry of Cooperation: 'केंद्र सरकारला महाराष्ट्र विधानसभेने तयार केलेल्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही'- NCP Chief Sharad Pawar
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी आपला राजीनामा भाजपच्या जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे सोपवला आहे. याशिवाय, पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊसेठ रासकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला झाला आहे. त्यावेळी राष्ट्रपती भवनात 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात महाराष्ट्रातील 4 नेत्यांची वर्णी लागली आहे. भाजप नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्री पद मिळाले आहे.