Cyclone Nisarga मुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणाच्या मदतीला भाजपा; देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट पहा
Devendra Fadnavis On Helping Nisarga Cyclone Affected (Photo Credits; Twitter)

निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisaraga Cyclone) कोकणवासियांचे (Konkan) मोठे नुकसान झाले आहे. घरांची छप्परे उडून गेल्याने, झाडे कोलमडून पडल्याने, विजेचे खांब, नेटवर्क टॉवर सर्व काही उद्ध्वस्त झाल्याने जवळपास कोकणातील नागरिक 15 वर्ष मागे गेले आहेत. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनसाठी महाराष्ट्र सरकारच्या सोबतच आता विरोधी पक्ष भाजपने सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या माहितीनुसार कोकणवासीयांच्या मदतीसाठी भाजपाने (BJP) ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ हे अभियान हाती घेतले आहे. याअंतर्गत जनसहभागातून गोळा झालेली आणि भाजपाच्या वतीने 14 ट्रक मदतसामुग्री मुंबई, ठाणे, पनवेल येथून नुकतीच रवाना झाली आहे. या कठीण काळात कोकणच्या पाठीशी भाजप उभी आहे असा विश्वाशी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विट मधून व्यक्त केला आहे..(Cyclone Nisarga चा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला 100 कोटींंची तातडीची मदत जाहीर, पंचनाम्यानंतर भरपाईचं स्वरूप ठरणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा)

देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनुसार भाजीपाला धान्य सामग्री यांच्या समवेतच कोकणात उद्ध्वस्त झालेल्या सुविधा पुन्हा निर्माण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. वीजेसाठी सोलर कंदिल आणि पावसाळा लक्षात घेता निवार्‍यासाठी ताडपत्री व सिमेंट पत्रे यावर भर देण्यात आला आहे. हा उपक्रम यापुढेही असाच सुरू राहील असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. ही सर्व मदत सामग्री कोकणासाठी पाठवत असताना मुंबईतील काही फोटो ट्विटर वर पहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र सरकारतर्फे यापूर्वी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना 100 कोटींची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्यानंतर तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला 75 कोटी,सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र ही रक्कम तोकडी आहे असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले होते.