रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण (Tiware Dam) फुटले असून, यात 22-24 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेबाबत विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी 'तिवरे धरण हे खेकड्यांनी भोक पाडल्याने फुटले' असे उत्तर दिले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने खेकडा आंदोलन सुरु केले आहे. सावंत यांच्या उत्तराबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी निषेध व्यक्त करत खेकड्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
नौपाडा पोलिसांना चक्क खेकडे देऊन, हे धरण पोखरणारे खेकडे मल्ल्यासारखेच पळून जात होते. त्यांना आम्ही पकडून आणले आहे. या खेकडयांना अटक करा’, असे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या गोष्टीचे फोटो सध्या व्हायरल होत असून, सावंत यांच्या वक्त्यव्याची सर्वत्र खिल्ली उडवली जात आहे. यासोबत एक पोस्टदेखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ‘धरण फोडल्याची व जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा केल्याची खेकड्यांनी दिली कबुली. आत्ताच आलेल्या बातमीनुसार एका खेकड्याला अटक झाली आहे.’ अशा आशयाचा मजकूर आहे. (हेही वाचा: 'खेकड्यांनी भोक पाडल्यानं तिवरे धरण फुटलं' जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे धक्कादायक विधान)
दरम्यान, सध्या मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे तिवरे धरण फुटून 23 जण वाहून गेले आहेत, पैकी 18 मृतदेह हाती लागले आहेत. याबाबत बोलताना चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांची पाठराखण करण्यासाठी सावंत यांनी या अपघातासाठी खेकड्यांना जबाबदार ठरवले होते. यावर राष्ट्रवादीने चक्क खेकड्यांना अटक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.