NCP ने फेटाळले शरद पवार व अमित शाह यांच्या बैठकीचे वृत्त; अशी कोणतीही भेट झाली नसल्याची नवाब मलिक यांची माहिती
Nawab Malik (Photo Credits: Twitter)

सध्या सचिन वाझे, परमबीर सिंह प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशात माध्यमांनी बातम्या दिल्या होत्या की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि अमित शाह (Amit Shah) यांची भेट झाली आहे. या बातमीनंतर महाराष्ट्रातील सरकार धोक्यात आहे असा अनेकांचा ग्रह झाला होता. मात्र आता शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुजरातमध्ये भेट घेतली, हे वृत्त राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी फेटाळून लावले आहे.

या गुप्त बैठकीच्या कथित वृत्तावर नवाब मलिक म्हणाले, ‘गुजरातमधील एका वृत्तपत्राने पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा पसरत आहेत. मात्र अशी कोणतीही बैठक झाली नाही.’ अमित शहा यांना शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीबद्दल विचारले असता, त्यांनी ‘सर्व काही जाहीर केले जाऊ शकत नाही’, असे म्हटले होते. त्यानंतर ही भेट घडली असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. (हेही वाचा: Sanjay Raut यांच्या 'सामना' तील रोखठोक वर NCP मधून Nawab Malik, Jitendra Awhad ते Ajit Pawar यांची अशी प्रतिक्रिया)

आता मलिक यांनी अशी भेट झाली नसल्याचे सांगितले आहे. मलिक पुढे म्हणाले, 'ही पूर्णपणे चुकीची माहिती आहे, ज्याद्वारे काही लोक मुद्दाम गोंधळ निर्माण करत आहेत. भारतीय जनता पक्ष असा गोंधळ निर्माण करत आहे. अशी बैठक कधी झाली नाही. पवारांना शाह यांना भेटण्याचे कारण नाही.’

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे दोन मोठे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल अहमदाबादला पोहोचले. यानंतर दोन्ही नेते गांधीनगरला पोहोचले. असे सांगितले जात आहे की, या दोन नेत्यांनी गांधी नगरमध्ये काही गुप्त बैठक घेतल्या. या काळात ते कोणास भेटले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.