मविआ नेत्यांवर कारवाई करण्याचा भाजपने काही महिन्यांपूर्वीच रचला होता कट; रोहित पवार यांचा आरोप
Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) मधील नेत्यांवर कारवाई करण्यासाठी भाजपने (BJP) काही महिन्यांपूर्वी षडयंत्र रचल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. यासाठी भाजप नेत्यांची मोठी बैठक झाली त्यात ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) च्या माध्यमातून मविआ सरकारच्या नेत्यांवर कशी कारवाई करण्यात येईल, याविषयी ठरवण्यात आले. यासंदर्भातील पत्र भाजपने केंद्र सरकारला दिले असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. आज जळगाव दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते असं म्हणाले. (हे ही वाचा: ‘येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घ्या’ आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळावरून आमदार रोहित पवार यांची सरकारला विनंती)

रोहित पवार म्हणाले की, "राजकारणासाठी विरोधक सीबीआयचा सर्रास गैरवापर करत आहेत. हा प्रकार केवळ आपल्या राज्यापुरता मर्यादीत नाही तर राज्याबाहेरही सुरु आहे. भाजपच्या या षडयंत्राची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडायला हवी." महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि खासदार ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यासाठी भाजपने रणनिती आखल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

"राज्याचे असंख्य प्रश्न आजही प्रलंबित आहेत. जीएसटी परताव्याचे 35 हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकले आहेत. मात्र हा पैसा मिळवण्यासाठी विरोधकांनी एक तरी पत्र केंद्राला लिहिलं का? याबद्दल ते एकही शब्द बोलत नाहीत. केंद्राच्या अखत्यारितील ओबीसी व मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांवर विरोधक बोलत नाहीत," असं म्हणत रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुढे त्यांनी मविआ सरकारच्या कामकाजाचा पाढा वाचला. केंद्राकडे जीएसटीचे ३५ हजार कोटी रुपये अडकलेले असताना राज्य सरकारने कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार केले. शेतकरी, मजूर, व्यापाऱ्यांसह इतर घटकांना मदतीचा हात दिला. कोरोना काळात आर्थिक ताण असूनही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केल्याचे त्यांनी म्हटले आहे.