‘येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घ्या’ आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळावरून आमदार रोहित पवार यांची सरकारला विनंती
NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून (Maharashtra Public Health Department Exam)आता पुन्हा राज्यात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वी परीक्षा झाल्यानंतर आता 24 ऑक्टोबरला दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अशावेळी सकाळी एका जिल्ह्यात आणि दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आली आहेत. असा काहींचा दावा आहे. यावरूनच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीट करत सरकारकडे काही मागण्या केल्या आहे. रोहित पवारांनी ट्वीट करत ' एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा. आणि उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती.' असं ट्वीट केले आहे. नक्की वाचा: Arogya Vibhag Exam Date 2021: महत्वाची बातमी! आरोग्य विभागाच्या 'गट क' आणि 'गट ड' च्या परीक्षेची तारीख जाहीर .

रोहित पवार ट्वीट 

दरम्यान गट क संवर्गासाठीची परीक्षा 24 ऑक्टोबरला 2 सत्रांमध्ये पार पडणार आहे तर गट ड संवर्गासाठीची परीक्षा 31 ऑक्टोबरला एकाच सत्रात होईल. राज्यभरातील 1000 पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा राज्य शासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे आणि करोनाविषयक नियमांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. परीक्षार्थींनी ऑनलाईन अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करून त्याद्वारे त्यांना नेमून देण्यात आलेले परीक्षा केंद्र आणि अन्य आवश्यक माहिती देण्यात येत आहे. असा खुलासा परीक्षेचे आयोजन करणाऱ्या न्यासा कम्युनिकेशन ने केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व गट ड पदभरती बातम्या बाबत वस्तूस्थितीदर्शक खुलासा

ट्वीट

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या 'गट क' आणि 'गट ड' संवर्गांतील विविध पदांसाठीच्या भरती परीक्षा सुधारित वेळापत्रकाप्रमाणे 24 आणि 31  ऑक्टोबर 2021 ला होणार आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. हे हॉलतिकीट ऑनलाईन डाऊनलोड करायचं आहे.