Navratri 2023: मुंबईमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान चालणार अतिरिक्त मेट्रो आणि बस सेवा, जाणून घ्या तपशील
Navratri 2023 (संग्रहित संपादित प्रतिमा)

आगामी नवरात्रोत्सवासाठी (Navratri 2023) एमएमआरडीएने (MMRDA) मुंबई मेट्रो लाईन 2 आणि लाईन 7 वर अतिरिक्त सेवा जाहीर केल्या आहेत. सणाच्या काळात नागरिकांना रात्री उशिरापर्यंत आरामदायी आणि सुरक्षित प्रवास पर्याय उपलब्ध करून देण्याचा या निर्णयाचा उद्देश आहे. येत्या 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये, लाइन 2 वर अंधेरी पश्चिमवरून सुटणारी आणि गुंदवली येथून लाईन 7 वरील शेवटची मेट्रो सेवा रात्री 12:30 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे. सध्या शेवटची सेवा दोन्ही स्थानकांवरून रात्री 10.30 वाजता सुटते.

या 14 अतिरिक्त सेवा अंदाजे 15 मिनिटांच्या अंतराने चालतील, ज्यामुळे नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित होईल. सध्या, लाइन 2 आणि लाइन 7 आठवड्याच्या दिवशी एकत्रितपणे 253 सेवा चालवतात, ज्या सकाळी 5:55 ते रात्री 10:30 पर्यंत पर्यंत चालतात. शनिवारी 238 सेवा आणि रविवारी 205 सेवा चालतात. एमएमआरडीएच्या मते, विस्तारित मेट्रो सेवांमुळे नागरिक वाहतुकीची चिंता न करता उत्सवाचा आनंद घेऊ शकतात.

दुसरीकडे, बेस्टने (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) आगामी नवरात्रोत्सवादरम्यान 15 ते 23 ऑक्टोबरदरम्यान विशेष बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस शहरांतर्गत भाविकांच्या गर्दीला सामावून घेण्याच्या उद्देशाने आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की, या विशेष बसेस भायखळा, महालक्ष्मी, शिवडी आणि शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणांवरून चालवल्या जातील, ज्याचे प्राथमिक गंतव्य महालक्ष्मी मंदिर आहे. (हेही वाचा: Navratri 2023 Colours for 9 Days: नवरात्री मध्ये यंदा घटस्थापनेपासून नवमी पर्यंत पहा कोणत्या दिवशी कोणता रंग)

नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान प्रवाशांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, बेस्ट आपल्या दैनंदिन सेवेत दोन डझनहून अधिक अतिरिक्त बसेसची भर घालणार आहे. या उत्सवादरम्यान शहरातील रहिवासी आणि अभ्यागतांच्या वाहतुकीच्या गरजा कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी विशेष बसेस 37, 57, आणि 151, A-63, A-77, 83, A-357 या विशिष्ट मार्ग क्रमांकांवर तैनात केल्या जातील.